हर घर तिरंगा मोहीमेसाठी आलेले ध्वज सदोष

रत्नागिरी:- हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत पंचायत समितीमार्फत वाटण्यात येणारे ध्वज ‘सदोष’ असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गुरुवारी काही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ही बाब पंचायत समितीच्या अधिकार्‍यांसमोर ठेवत त्यांना धारेवर धरले.

हर घर तिरंगा मोहीमेसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतींना तिरंग्याचे वाटप करण्यात येत आहे. काही ग्रामपंचायतींना मिळालेले तिरंगे सदोष असल्याचे दिसून आले आहेत. काही तिरंग्यांमध्ये एका रंगाचा आकार मोठा, तिरका असलेला तिरंगा, तिरंग्याची निकृष्ट शिलाई, काही तिरंग्यावर मध्यभागी अशोकचक्र एका बाजुला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात याबाबत तीव्र नाराजी आहे.

तिरंग्यासाठी ग्रामपंचायतीमधून निधी गोळा करण्यात आला. त्यानंतर रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या निधीमधून तिरंग्यासाठी पैसे देणार असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबतच्या सूचनाही पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेले धनादेश त्यांना परत करण्यात आले. परंतु देण्यात येणार ध्वज सदोष असल्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या निदर्शनास आले आहेत. हे ध्वज ग्रामस्थांपर्यंत कसे पोहचवायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळाने तीन वेळा ध्वज वितरणासाठी आणले होते. ते सर्व ध्वज वितरण करुन संपले आहेत. शहरातील काही खासगी व्यावसायिकांनी ध्वजाची विक्रीसाठी ऑर्डर दिली होती. परंतु ध्वज मोफत देण्याची घोषणा झाल्यामुळे विक्रेत्यांनीही ऑर्डर रद्द केली आहे. पंचायत समिती, नगर पालिका यांनी दिलेल्या ऑर्डरपैकी निम्म्याहून अधिक ध्वज उपलब्ध झाले आहेत. त्यातही अनेक ध्वज सदोश असल्याने कशा पध्दतीने त्याचे वितरण करायचे असा प्रश्न प्रशासनालाही पडला आहे.
दरम्यान, रत्नागिरीच्या तहसीलदारांनी  असे सदोष तिरंगे संबंधित कार्यालय व संस्थेस तात्काळ परत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.