पाणीयोजनेचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आदेश

पाऊस थांबण्याची प्रतीक्षा ; पालिकेने घेतली गंभीर दखल

रत्नागिरी:- शहरासाठीच्या सुधारित पाणीयोजना पूर्ण झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच खोटा ठरला आहे. पेठकिल्ला भागात या योजनेचे काम अर्धवट आहे. खोदकाम करून ठेवण्यात आले आहे; मात्र अजून पाइपलाइन जोडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरू आहे. तेथील माजी नगरसेवकाने हे उघड केल्यानंतर पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर तत्काळ ठेकेदाराला या भागातील पाणीयोजनेचे काम पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

शहरासाठीची सुधारित पाणी अजूनही गाजत आहे. सुरवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. श्रेयवादाने त्याला सुरवात झाली. त्यानंतर त्याच्या प्रेझेंटेशनसाठी तत्कालीन नगराध्यक्षांनी केबिनला कुलुप लावल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर योजना मंजूर झाली आणि कामाला सुरवात होणार तोवर वाढीव भारपाई देण्याबाबत ठेकेदाराने केलेल्या मागणीचे प्रकरण कोकण आयुक्तांकडे गेले. त्यांनी पुढील आदेशापर्यंत या योजनेला स्थगिती दिली. अखेर ठेकेदाराला वाढीव ९ कोटी रुपये देण्याचे मान्य झाल्यानंतर योजनेच्या कामाने गती घेतली. या दरम्यान शहरात सीएनजी पाइपलाइन टाकण्यात आल्या. दोन्ही योजनेच्या खोदाईमुळे रस्त्यांची चाळण झाली. दुरवस्था झालेल्या या रस्त्यांमुळे नागरिकांची आणि वाहनधारकांची प्रचंड ओरड सुरू झाली. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने रस्त्यांसाठी निधी आणला आणि सर्व रस्ते गुळगुळीत झाले.

पावसापूर्वी पाणीयोजना पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न होता; मात्र ते शक्य झाले नाही. ८० टक्केच्या वर पाणीयोजना पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने केला होता; मात्र शहरातील पेठकिल्ला पठाणवाडी आदी भागात अजून पाणीयोजनेचे पाइपच टाकण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती स्थानिकानी पुढे आणली. ठेकेदाराने पाइपलाइन टाकण्यासाठी अर्धवट खोदाई आणि अर्धवट पाइप टाकून ठेवल्याचे उघड झाले.