ओंकार ग्रामीण पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापिका वासंती निकम यांच्यासह 8 जणांची निर्दोष मुक्तता

देवरुख:- देवरुख शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत कोटींचा अपहार झाला होता. यामध्ये 15 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. असे असले तरी याच प्रकरणातील आणखी 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन व्यवस्थापिका वासंती निकम, रश्मी सप्रे, रघुनाथ कानिटकर, जयश्री कानिटकर यांचे वारस, शंकर शेटये, वसंत केतकर यांचे वारस, अनंत राजवाडे यांचे वारस, भालचंद्र जोशी यांचा समावेश आहे. 

2014 साली हा प्रकार उघडकीस आला होता. 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2015 या कालावधीत 1 कोटी 92 लाख 56 हजार 86 रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळयाचा निकाल 2 ऑगस्ट रोजी लागला. प्राधिकृत अधिकारी अ‍ॅड. साळुंखे यांनी दिलेल्या आदेशनुसार वरील 8 जणांवर संचालकांनी केलेले आरोप सिध्द केलेले नाहीत. वरील संचालक समिती सभांना उपस्थित राहिलेले नाहीत, त्यांच्या इतिवृत्तांमधील सह्या जुळत नाहीत, तसेच व्यवहाराबाबत, कामकाजाबाबत सहभाग दिसून येत नाही. हे संस्थेने व इतर जबाबदारांनी पुराव्यानिशी सिध्द केलेले नसल्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. 

या घोटाळयात अजूनही दोषी असलेले कर्मचारी जान्हवी मुळये, संगीता कुलकर्णी, तत्कालीन संचालक मुकुंद जोशी, अनिल राजवाडे, सुनील खेडेकर, अनिता किर्वे, विकास शुंगारे, राजाराम जोशी, सुजाता कारेकर, दत्तात्रय भस्मे यांना प्रत्येकी 24 लाख 36 हजार 177 रुपये तर गजानन जोशी व मधुरा केळकर यांना प्रत्येकी 24 लाख 36 हजार 178 रुपये, कर्मचारी मनाली मांगले यांना 18 लाख 39 हजार 670 रुपये, संचालक नितीन पुरोहित यांना 24 लाख 36 हजार 179 रुपये, संदीप कारेकर यांना 78 हजार 264 रुपये इतकी रक्कम भरणा करावी लागणार आहे. ही रक्कम 15 टक्के व्याजासह यांच्याकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या त्यांचे जंगम व स्थावर मिळकतीतून 45 दिवसांच्या आत संस्थेत भरणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.