जिल्ह्यात खताचा तुटवडा; शेतकरी नाराज 

रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला खत पुरवठा करण्यासाठी नियुक्त कंपन्यांनी नियोजन केलेले नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्याला 14 हजार मेट्रिक टन खताचे आवतन मंजूर असून  साडेतीन हजार मेट्रिक टन येणे अपेक्षित होते; परंतु आतापर्यंत अवघे 636 मे. टन म्हणजेच अवघे पंधरा टक्केच खत प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात खताचा तुटवडा जाणवत असून शेतकरी नाराज झाले आहेत. नियोजन बारगळल्याने हा गोंधळ उडाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सध्या रस्तेमार्गे पुरवठा सुरू असून जिल्ह्यात गतवर्षी 13 हजार 519 मे. टन खताचा तर 6 हजार 061 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला होता. 2022 च्या खरीप हंगामासाठी विविध खतांची 22 हजार 146 मे. टनाची मागणी केली असून शासनाने 14 हजार 640 मे. टन आवतन मंजूर केले आहे. तसेच 9 हजार 454 क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यातील जुलैे महिन्यापर्यंत साडेतीन हजार मे. टन खत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु तुलनेत 15 टक्केच खत आले. वाहतुकीच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण खत पुरवठा करणार्‍या कंपन्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे सध्या रस्तेमार्गे खत आणले जात
आहे.

लावणीनंतरचा दुसरा आठवडा संपत आला तरीही पुरेसे खत प्राप्त झालेले नसल्याने शेतकरी राजा नाराज झाला आहे.  खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना वेळेत मागणी नोंदवण्याचे आवाहन  करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही चालू झाली. काही सोसायटींमार्फत खतांची मागणी केली होती. रत्नागिरी, दापोली, लांजा, राजापूर, चिपळुणातील सोसायटींना खताचा पुरवठाही झाला आहे; पण आलेले खत कमी असल्याने शेतकर्‍यांचा गोंधळ उडाला आहे.