बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवलेल्या तिघा शिक्षण सेवकांवर कारवाई

रत्नागिरी:- बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे क्रीडा कोट्यातून नोकर्‍या मिळाल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यभरातील ९२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यातील रत्नागिरी जिल्हा परिषदेतील तिन शिक्षण सेवकांचा समावेश आहे. त्यातील दोघांवर शिक्षण विभागाकडून बडतर्फीची कारवाई झाली असून एकाला नोकरीमध्येच रुजू करुन घेण्यात आले नाही. याला प्राथमिक शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून सराकरी नोकर्‍या मिळवणार्‍या राज्यभरातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर बडतर्फीच्या कारवाईसाठी शासनाने पावले उचलली आहेत. शासनाकडून जाहीर केलेल्या ९२ जणांच्या यादीत गृह विभागाचे सर्वाधिक कर्मचारी असून महसूल, नगरविकास, उर्जा, शालेय शिक्षण, लेखा व कोषागर, कृषी, सामान्य प्रशासन विभागातही बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्‍या मिळाल्याचे उघडकीस आले आहे. राज्य क्रीडा विभागाने वेबसाईटवर टाकलेल्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील दोन शिक्षण सेवकांचा समावेश आहे. त्यामध्ये वैशाली म्हस्के, आशिष चव्हाण यांचा समावेश आहे. अन्य एका शिक्षण सेवकाला रत्नागिरी जिल्हा परिषदेत रुजू करुन घेण्यात आले नव्हते. क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर ते बोगस असल्याचे आढळून आले होते. तीन वर्षांपुर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेतील एका भरती प्रक्रियेवेळी तिन खेळाडूंनी बोगस प्रमाणपत्रे सादर केली होती. हा प्रकार तत्कालीन सामान्य प्रशासन अधिकारी एस. एस. सावंत यांनी उघडकीस आणला होता. त्या प्रमाणपत्रांची विशेष तपासणी करुन त्यांच्यावर कारवाईसाठी पावले उचलली होती. अखेर त्या तिन्ही जणांकडून भविष्यात असे वर्तन करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील प्रकारांना वाचा फुटली होती.