नव्या मासेमारी हंगामासाठी मच्छीमार सज्ज 

रत्नागिरी:- शासनाच्या निर्देशाप्रमाणे १ ऑगस्टपासून मासेमारी बंदी कालावधीत संपुष्टात येत असल्यामुळे पर्ससिननेट वगळता ट्रॉलिंग, गिलनेटसह फिशिंगच्या नौका समुद्रावर स्वार होण्यास सज्ज झाल्या आहेत. पावसाने विश्रांती घेतली असून मासेमारीला पोषक वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तिन हजारहून अधिक नौकांना मासेमारीसाठी जाता येणार आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त निर्देशांनुसार १ जुन ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी केली जाते. ६० दिवसांच्या बंदीनंतर मासेमारी पुन्हा १ ऑगस्टपासून समुद्रावर स्वार होणार आहेत. दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, मंडणगड या तालुक्यात छोटी-मोठी २७ मासेमारी बंदरे आहेत. त्या ठिकाणी मासळी उतरवणे किंवा नौका उभ्या करुन ठेवण्याची सुविधा आहे. बंदी कालावधीत बोटीच्या इंजिनाची देखभाल दुरुस्ती व डागडुजी, बोटीची रंगरंगोटी यासह जाळयांची दुरुस्ती व नवीन जाळयांची खरेदी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मासेमारीच्या आरंभच्या काळात समुद्रात चक्रीवादळ तसेच प्रतिकूल हवामान असल्याने मासेमारी हंगामाला विलंबाने सुरुवात झाली होती; मात्र यंदा मासेमारीसाठी वातावरण अनुकूल आहे. गेले आठ दिवस पावसाचा जोर ओसरलेला आहे. हवामान विभागाकडून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. किनारी भागात हलका वारा असून समुद्रात पाण्याला करंट आहे. बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलिंग मच्छीमारी नौका मासेमारीला जाऊ शकतात. हंगामाच्या आरंभीला बांगडा, चिंगळं यासारखी मासळी सापडत असल्यामुळे याचा फायदा उठवण्यासाठी मच्छीमार दरवर्षी तयार असतात.