जिल्ह्यात भातशेती लावणीची 80 टक्के काम पूर्ण

रत्नागिरी:- जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक वाटचाल सुरू केल्याने जिल्ह्यातील भात क्षेत्रासह खरीप क्षेत्रात 80 टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील भात क्षेत्रातील 56 हजार हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे पूर्णत्त्वास गेली आहेत.

जिल्हाभरात साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र नाचणीच्या लावगडीखाली आणण्यात आले आहे. मोसमी पावसाने जूनमध्ये सरासरी पूर्ण केल्यानंतर लावणीला समाधानकारक असे पर्जन्यमान सुरू झाले. त्यामुळे बळीराजाची रोपे लावण्यासाठी लगबग सुरू झाली. दरम्यान, पाऊस ओसरल्याने शेतकर्‍यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जूनच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात लांबणीवर पडलेली भात लावणीची कामे जुलैमधील पावसाच्या सातत्याने वेगाने सुरू झाली आहेत. लावणीचा शेवटचा आठवडा सुरू असून आतापर्यंत 53 हजार हेक्टर क्षेत्रात लावण्या उरकण्यात आल्या आहेत.  या वर्षी 70 हजार हेक्टर क्षेत्रात भात तर 15 हजार हेक्टर क्षेत्रात लावणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जुलैच्या सुरुवातीला प्रतीक्षा करायला लावणार्‍या पावसाने मागील आठवडाभर सातत्य ठेवल्याने लागवड क्षेत्र बर्‍यापैकी भिजले आहे. अनेक नद्यांसह धरण क्षेत्रातही पाणी संचय समाधानकारक झाल्याने सिंचनाच्या बाबतीत शेतकर्‍यांकडून निश्चितता व्यक्त करण्यात येत आहे. खरीप क्षेत्रात भातासह नाचणीच्या लावणीला वेग आला आहे.

जूनमध्ये प्रतीक्षा करायला लावणार्‍या पावसाने उसंत घेतल्याने केलेले पेरे सुकण्याची भीती होती. मात्र, जुलैमध्ये पाऊस पुन्हा सुरू झाल्याने लावणीची कामे सुरू झाली. पावसाने सातत्य दाखविल्याने कृषी विभागानेही खतासह निविष्ठांचा पुरवठा शेतकर्‍यांच्या थेट बांधावर पोहोचविल्या. त्यामुळे लॉकडाऊन  स्थितीतही शेतकर्‍यांनी जवळपास खरिपाच्या बेगमीची खंडित झालेली  कामेे हातावेगळी केली. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत 20 टक्के जादा क्षेत्र यावर्षी लागवडीखाली आले आहे.