गतवर्षाच्या तुलनेत  यंदाचा पाऊस हजार मि. मी. ने पिछाडीवर

रत्नागिरी:- गेला आठवडाभर पाऊस गायब झाला आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिला असताना जुलैचा दुसरा पंधरवडा कोरडा जाऊ लागला आहे. रविवारपासून पावसाने उसंत घेतली. आखाडीचा शेवटच्या बुधवारीही तुरळक सरींचा अपवाद वगळता जवळपास गायब झाल्यासाराखा होता. दरम्यान, पावसाच्या या लंपडावामुळे गतवर्षाच्या तुलनेत  यंदाचा पाऊस हजार मि. मी. ने  पिछाडीवर गेला आहे. असे असले तरी शनिवार पर्यंत जिल्ह्यात पावसाचा ‘ग्रीन अलर्ट’ देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाने पाठ फिरविली आहे. बुधवारी  जिल्ह्यात 14.33 मि.मी. च्या सरासरीने केवळ 129 मि. मी. एकूण पाऊस झाला. बहुतांश तालुक्यात तुरळक पाऊस झाला. पावसाचा जोर ओसरल्याने गतवर्षाचा याच कालावधीचा विचार करताना तुलनेत एक हजार मि.मी.ने पाऊस पिछाडीवर पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने 2952 मि.मी. ची सरासरी ओलांडली होती. मात्र, या वर्षी आतापर्यंत पावसाने केवळ 1900 मि.मी.ची सरासरी गाठली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 53 टक्के पाऊस झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात मंडणगड 23 मि.मी., दापोली 34, खेड 18, गुहागर 17, चिपळूण 14 , संगमेश्वर 5, लांजा 6 , रत्नागिरी आणि राजापूर प्रत्येक केवळ 1 मि.मी. पावसाची नोंद झाली.

जुलै एंड कोरडा जाण्याची शक्यता असली तरी ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाजानुसार  जिल्ह्यात 28 ते 30 जुलैया कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचे पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाने हात आखडा घेतल्याने शिवारात उभी भात पिके सुकण्याची भिती आहे.  किड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची धास्ती आता शेतकर्‍यांमध्ये आहे.