रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच सुधारीत प्रस्ताव

मुख्यमंत्र्यांच्या सूचना; तातडीने अंमलबजावणी 

रत्नागिरी:- रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा सुधारीत प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत आणावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. यानुसार याबाबतची कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली आहे. 

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी एन पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले की, राज्यभरातील वैद्यकीय सेवा सुविधांचे जाळे यांचे विस्तारीकरण करीत असताना रत्नागिरी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्राधान्याने या महाविद्यालय उभारणीबाबतचा सुधारीत प्रस्ताव सादर करावा. याबरोबरच या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरु करता येईल का, सुरु करायचे झाल्यास काय तयारी करणे आवश्यक आहे याची तयारी करण्यात यावी.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबतची तयारी करावी. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करील. रत्नागिरी जिल्हयात शासकीय रुग्णालय, महिलांचे रुग्णालय आणि मनोरुग्णालय एकत्र असलेल्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारताना या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून वित्त व नियोजन,महसूल आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अभिप्रायही घेण्यात यावेत अशा सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.