जिल्ह्यातील दहा शाळा आदर्श बनवण्यासाठी 8 कोटींचा प्रस्ताव 

रत्‍नागिरी शहरातील दामले विद्यालयाचा समावेश

रत्नागिरी:- जिल्ह्यातील दहा शाळा आदर्श बनविण्यासाठी राज्य शासनाकडून आदेश प्राप्त झाले असून त्यासाठी ७ कोटी ८२ लाख ४५ हजाराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यातील पायाभूत सविधांमध्ये जुनी इमारत दुरुस्तीला ९५ लाख तर नवीन बांधकामाला १ कोटी ८३ लाख रुपये जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. दुरुस्तीच्या कामांच्या निविदा काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुचना देण्यात आल्या आहेत.

कौशल्य आधारीत शिक्षण पध्दती विकसित करताना शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देणार्‍या दहा शाळा विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय या भौतिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही वाढविण्यात येणार आहे. नवनिर्मितीला चालना देणारे कौशल्यांचा विकास, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मुल्ये अंगी बाणवणे, संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी अशी तयारी करवून घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक गोष्टी त्या-त्या शाळांना दिल्या जातील. मागील काही वर्षात ज्या जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता चांगली आहे, अशा शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी आराखडा तयार केला असून इमारत दुरुस्तीचा ९५ लाख ८८ हजार ७१७ रुपयांचा निधी येत्या काही दिवसात खर्ची टाकला जाईल. त्यानंतर नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक ६ कोटी ८६ लख ५७ हजार रुपयांपैकी ३० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामध्ये २ कोटी २२ लाख मिळणे अपेक्षीत होते; परंतु शासनाकडून १ कोटी ८३ लाख मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित साडेचार कोटी मिळणार आहे. त्याची प्रक्रियाही पुढील महिन्यात सुरु केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

*जिल्ह्यातील निवडलेल्या आदर्श शाळा

अनुक्रमे:- शाळेचे नाव/  दुरुस्ती निधी (रुपये)/ नवीन बांधकाम निधी (रुपये)
१)खेर्डी/ १ कोटी/ ९० लाख २० हजार
२) दामले विद्यालय /२४ लाख ८८ हजार / ५१ लाख ८२ हजार

३)वाजपेयी स्कुल, गुहागर,  ७१ लाख ३३ हजार
४) साखरी आगार नं १/ १६ लाख ४६ हजार/ ४७ लाख १७ हजार
५) साखरी असणगी नं. २/ १५ लाख १२ हजार/  ४८ लाख ७६ हजार
६)लांजा नं. ५ /  ६० लाख ५८ हजार
७)नुतन विद्यामंदिर मंडणगड/ ११ लाख ९९ हजार/ २८ लाख ७० हजार
८) साखरीनाटे फिशरीज स्कुल / ५ लाख / ८५ लाख ६७ हजार
९) फणसू / १९ लाख १७ हजार / २६ लाख ५५ हजार
१०) आरवली नं. १ / ३ लाख २४ हजार / ७५ लाख  ७५ हजार