पर्यटन स्थळं, किल्ले, राजवाडा जतन करण्याचा 20 कोटींचा प्रस्ताव लाल फितीत

रत्नागिरी:- मागील वर्षी पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक पर्यटन स्थळं, किल्ले, राजवाडा यांचे जतन करण्यासाठी सुमारे वीस कोटीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते; मात्र त्याला निधी मिळालेला नव्हता. सरकार बदलल्यामुळे यंदा त्याला निधी मिळेल अशी आशा पर्यटकांसह रत्नागिरीवासींयाकडून व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला ऐतिहासीक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू आहेत. त्याचे जतन केले तर पर्यटनालाही चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते. जयगड, पुर्णगड सारख्या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिल्यानंतर तेथे पर्यटकांची पावले आपसूकच वळली आहेत. दिवाळी, ख्रिसमस, मे महीना या सुट्टीच्या काळामध्ये लाखो पर्यटक कोकणात येतात. त्यांची पावले आपसुकच ऐतिहासीक ठिकाणांकडे वळतात. हे लक्षात घेऊन पुरातत्व विभागाकडून रसाळगडच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी, कातळशिल्पांच्या संरक्षण आणि सुशोभिकरणाचा साडेचार कोटी रुपयांचा तर थिबापॅलेसमध्ये दालन उभारण्यासह अन्य डागडुजीसाठी 3 कोटी रुपयांची मागणीचा प्रस्ताव मागील दोन वर्षात शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला अजुनही निधी मिळालेला नाही. विविध वैशिष्ठय असलेली अनेक कातळशिल्पे कोकणातील कातळांवर आहेत. त्याचा शोध गेल्या काही वर्षांमध्ये लावण्यात आला होता. त्यांचे जतन केले तर पर्यटनाला चालना मिळू शकते. जागतिकस्तरावर त्याची दखल घेण्यात आली आहे. रत्नागिरीतील थिबा राजवाड्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंचे वैशिष्ठ्यपूर्ण दालन उभारण्यात येणार आहे. या राजवाड्याला देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही भेटी देत आहेत. वाडा पाहण्याबरोबरच त्याचे म्युझिअममध्ये रुपांतर करण्याबाबत विचार सुरु आहे. कोरोनाच्या लाटेमुळे पुरातत्त्व विभागाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांना निधीची देण्यात आलेला नव्हता. याला पुरातत्वच्या अधिकार्‍यांनीही दुजोरा मिळाला आहे. विविध विकास कामे थांबली असून नव्या सरकारमध्ये याचा विचार होईल अशी चर्चा सुरु आहे.