चार तालुक्यात एक लाख सदस्य नोंदणीचे शिवसेनेचे उद्दिष्ट

रत्नागिरी:- राज्यात शिवसेना पक्षांतर्गत आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने पुन्हा संघटना बांधण्यासाठी सदस्य नोंदणीचे अभियान राज्यभरात सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेना उपनेते तथा राजापूरचे आमदार राजन साळवी, दक्षिण रत्नागिरीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रत्नागिरी, लांजा, राजापूर,संगमेश्वर या चार तालुक्यांना एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पत्रकारांना दिली.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सत्तेत आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती, परंतु महिन्याभरापूर्वीच शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत स्वतंत्र गटाची स्थापना करून भाजपच्या मदतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला भाग पाडत ना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. दोन तृतीयापेक्षा अधिक आमदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेने आता पुन्हा एकदा संघटना बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हाप्रमुखांच्या झालेला बैठकीत राज्यात शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्याची सूचना देण्यात आली होती. सर्व जिल्हाप्रमुखांना आपल्या जिल्ह्यात सदस्य नोंदणी करण्याचे आदेश श्री. उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी दक्षिण रत्नागिरीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी आठवडा बाजार येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या चार तालुक्यांच्या तालुकाप्रमुखासह प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारी सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
 

शिवसेना उपनेते तथा राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रत्येक तालुक्यातून 25 हजार तर दक्षिण रत्नागिरीतून 1 लाखाहून अधिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट तालुका प्रमुखांसह जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी यांना देण्यात आले आहे. महिनाभरात सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची सूचना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केली आहे.