प्लास्टिक बंदीसाठी शहरातील 43 व्यापाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात नगर परिषद प्रशासनामार्फत ‘एकल वापर प्लास्टिक’ वापरासंदर्भात वेळोवेळी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 43 व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एकल प्लास्टीक न वापरण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यापकरणी त्या व्यापाऱ्यांकडून 54, 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे गेल्या जून महिन्यात ‘एकल प्लास्टिक’ वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्ग पुरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबु, लाकडी वस्तु, सिरामिक्सचे प्लेट, वाट्या आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपुरक वस्तुंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केलेले आहे. प्लास्टिकच्या वस्तू पासुन पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होवू नये, या दृष्टीने यावर पुर्नप्रक्रिया करण्यावर अधिक भर द्यावा, असेही सांगण्यात आलेले आहे.

1 जुलै, 2022 पासून बंदी घालण्यात येणारे ‘एकल वापर प्लास्टीक’ वस्तूं यात विशेषत: सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकॉल, प्लास्टीकचे मिठाईचे बॉक्स, प्लास्टीक आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काड्याच्या कान कोरणे, प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅन्डी, आईक्रीम कांड्या, प्लास्टिक प्लेटस, कप ग्लासेस व इतर साहित्यांचा समावेश आहे. प्रशासनस्तरावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार रत्नागिरी नगर परिषद प्रशासनानेही शहरात एकल प्लास्टिक वापर बंदीची कारवाई हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत ठिकठिकाणी केलेल्या कारवाईनुसार 43 व्यापाऱ्यांवर एकल प्लास्टिक वापर विषयक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 54 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार 500 रूपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रूपयांपर्यंत दंड. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास 10 हजार रूपये दंड तर तिसऱ्यांदा कोणी धाडस केले तर त्यांच्याविरुद्ध 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास असेल.