सोशल मीडियाची कमाल! आडिवरेतून चप्पल पोहचली थेट लंडनला 

रत्नागिरी:-  हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात कधी कोण कसा फेमस होईल याचा प्रत्यय आडिवरे येथील युवकाला आला आहे. कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या युवकाला थेट लंडन येथून चप्पलेची मागणी आली आणि रत्नागिरीतील आडिवरे (ता. राजापूर) या ग्रामीण भागात तयार झालेली ही चप्पल थेट लंडनला पाेहाेचली. 

आडिवरे गावातील सुनील सूर्यकांत आडिवरेकर या तरुणाने तयार केलेली ही चप्पल सातासमुद्रापार पाेहाेचली. आडिवरे येथे सुनीलचे वडील सूर्यकांत आडिवरेकर यांचे छाेटेसे दुकान आहे. वडिलांसाेबत दुकानात येता येता चप्पल तयार करण्याची कला त्याला आकर्षित करू लागली. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी त्याने वडिलांबराेबर व्यवसायाला सुरुवात केली. गाव छाेटेसे असल्याने गावात राहून आपल्या कलेचे चीज हाेणार नाही, असे मनात ठरवून त्याने मुंबई गाठली. मुंबईत आपले बस्तान बसवीत असतानाच वयाच्या २५ व्या वर्षी वडिलांचे अकाली निधन झाले. ज्यांच्या हाताला धरून त्याने व्यवसायाला सुरुवात केली हाेती, ताे मायेचा हातच त्याच्या पाठीवरून दूर गेला हाेता.

 मुंबईत काम करताना त्याने काेल्हापुरी चप्पल तयार करण्यास सुरुवात केली. त्याने बनविलेली पहिली चप्पल मुंबईतील वरळी भागात गेली आहे. त्याचवेळी साेशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ अपलाेड झाला आणि  हा व्हिडीओ पाहून दिल्लीतून पहिली ऑर्डर आली. त्यानंतर हैदराबाद याठिकाणी त्याने चप्पल पाठविली.

साेशल मीडियावरील व्हिडीओ पाहून लंडन येथील रतन जयस्वाल नावाच्या व्यक्तीने सुनीलशी संपर्क साधून चप्पलची मागणी केली. त्याने आडिवरे येथून ही चप्पल मुंबईतील अंधेरी येथे पाठविली असून, तेथून ती लंडनच्या दिशेने रवाना झाली आहे.