भाताचे उत्पन्न वाढवण्यासाठी चारसूत्री लागवड शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार

रत्नागिरी:- कोकणात भाताचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी चारसुत्री भातलागवड तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी दापोली कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे.

‘ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रम’अंतर्गत ‘कृषीज्योती’ गटातील विद्यार्थिनींनी सौ. मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण बेंडल या प्रगतशील शेतकर्‍यांच्या शेतात चारसुत्री भातलागवडीचा उपक्रम राबवला. हे प्रात्यक्षिक करताना लागवडीच्या दोन दिवस आधी जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणारी गिरीपुष्प हे हिरवळीचे खत शेतात टाकण्यात आले. त्यानंतर ‘रत्नागिरी ५’ या भाताची रोपे वापरून १५ बाय २५ सेंटिमीटर अंतरावर चुडांची नियंत्रित लावणी करण्यात आली. यामुळे बियाण्यांचा रोपे तयार करण्याचा व लावणीचा खर्च कमी होतो. ३ दिवसांनी प्रत्येक ४ चुडांच्या चौकोनात २.७ ग्रॅम वजनाची युरिया ब्रिकेट हाताने पाच सेंटीमीटर खोल खोचली. त्यामुळे खत कमी लागले व वापरलेल्या खताचा ८० टक्के उपयोग होतो. अशा प्रकारे चारही सूत्रांचा वापर करून चार सुत्री भात लागवड राबविण्यात आली त्याचप्रमाणे लावणी आधी रोपांवर अझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची प्रक्रिया करण्यात आली हा उपक्रम संस्कृती गावडे, संजना सावंत, श्रिया आंब्रे, रिया, अमिषा, मारिया, दिप्ती, अंजना, निवेदिता, अनुश्री या कृषी ज्योतींनी राबविला हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यक सौ. मर्चंडे व शेतकरी प्रवीण बेंडल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमार्फत विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचवले जाते. कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, डॉ. व्ही. एस. दांडेकर, डॉ. देवगिरीकर, डॉ. आर. आर. राठोड, डॉ. आशिष शिगवण व सर्व विषयतज्ञ शिक्षकांच्या मार्गर्शन मिळाले.