जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील दहा गावे ‘डेंजर झोन’मध्ये

रत्नागिरी:- वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस जोडीला मोठी भरती असा संगम झाल्यास किनारीपट्टीवर गावांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाकडून सतर्कतेच्या सुचना कोकण किनारपट्टीवरील गावांना दिल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दहा किनारी गावांचा समावेश आहे. तेथील नागरिकांना सुरक्षेसंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. अधूनमधून वेगवान वारेही वाहत आहेत. कोकणात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला चौदा वेळ उधाणाच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवरील गावे समुद्राच्या उधाणाच्या छायेत आहेत. १३ ते १७ जुलै आणि ३० व ३१ जुलै दरम्यान मोठ्या लाटा भरतीवेळी उधाणाची शक्यताही वर्तविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून समुद्र खवळलेला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रालगतच्या गावांना, वस्त्यांना स्थानिक तहसील प्रशासनामार्फत नोटिसा दिल्या जातात. मात्र, किनारपट्टीवरील नागरिकांचा मच्छीमार व्यवसाय असल्यामुळे नोटीस देऊन हे नागरिक अन्यत्र जाण्यास उत्सुक नसतात. यंदा संभाव्य सागरी उधाणांची शक्यता विचारात घेऊन हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टीवरील ६० गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी जिल्हयातील गावखडी, हर्णे बंदर, काळबादेवी, दाभोळे, गणपतीपुळे, मालगुंड, केळशी, आंबोळगड, जैतापूर, नाटे आदी गावांचा समावेश आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास व त्याचवेळी समुद्राला उधाण आल्यास किनारपट्टी व खाडी लगतच्या गावांमध्ये, वस्तींमध्ये उधाणाचे पाणी घुसण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन संबंधित नागरिकांनी उधाणावेळी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.