सॅटेलाइट टॅगिंग केलेली पाच पैकी तीन कासवं नॉटरिचेबल

रत्नागिरी:- समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी सावनी संपर्क तुटला आहे. या कासवाने आतापर्यंत १९६० किलोमीटरचा प्रवास केला आहे. पाच पैकी तिन कासवं नॉटरिचेबल झाली असून दोन कासवांशी संपर्क असून ती दक्षिणेकडे कर्नाटकच्या किनारीपट्टीवर आढळली आहेत.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागासह कासवमित्रही सरसावले आहेत. ही कासवं एका किनार्‍यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो यावर अजूनपर्यंत अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमाफत वेळास, आंजर्ले, गुहागर किनार्‍यांचा पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. कोकणातील किनार्‍यांवर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे.

कासवांचा प्रवास सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम लक्ष्मी कासवाचा संपर्क तुटला. २ मार्चला त्याची शेवटची नोंद मिळाली होती. त्यानंतर प्रथमा कासवाचा संर्पक तुटला आणि त्यापाठोपाठ ५ जूनला सावनी कासाव नॉटरिचेबल झाले आहे. सावनी या कासवाने आंजर्ले किनारी २५ जानेवारीला ८७ अंडी घातली. त्यानंतर पुन्हा महिन्याभराने केळशी किनारी अंडी घातली. कासवे कमी कालावधीत पुन्हा अंडी घालू शकतात, याची नोंद या निमित्ताने अभ्यासकांना करता आली. पुढे सावनीचा प्रवास दक्षिणकडे कर्नाटकच्या दिशेने सुरु झाला. टॅग केल्यापासून या कासावाने १३० दिवस समुद्रात प्रवास सुरु ठेवला होता. आतापर्यंत सुमारे १ हजार ९६० किलोमीटर प्रवास झाल्यानंतर त्यांचा सिग्नल येणे कमी होऊ लागले. त्याची शेवटची नोंद कर्नाटकमधील कुमठे किनार्‍यापासून १०० किलोमीटर खोल समुद्रात दर्शवत होते. सध्या पावसामुळे सिग्नल यंत्रणा कमकुवत झाली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे. टॅग केलेल्यापैकी तिन कासवं नॉटरिचेबल झाली असली तरीही अजुन दोन कासवं शिल्लक आहेत. त्यात वनश्री हे गोवा किनारपट्टीच्या जवळपास आहे तर रेवा हे कर्नाटक किनारी आहे.