जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ पुन्हा सुरु झाला असून बुधवार (ता. 28) दिवसभर पावसाचाच होता. रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूणसह लांजा, राजापूरात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुना, काजळी नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 12 मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड 25, दापोली 13, खेड 4, गुहागर 6, चिपळूण 6, संगमेश्‍वर 13, रत्नागिरी 12, लांजा 22, राजापूर 7 मिमी नोंद झाली. जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मॉन्सून स्थिरावलेला नव्हता. शेवटच्या टप्प्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेतील सरासरीमधील तफावत कमी होऊ लागली आहे. 1 ते 29 जुन या कालावधीत 588 मिमी सरासरी पाऊस झाला आहे. तर गतवर्षी 1181 मिमी नोंद होती. 600 मिमी पावसाची तफावत होती. पाऊस अस्थिर असल्यामुळे भात लावणीच्या कामांवर परिणाम झालेला होता. गेले चार दिवस पाऊस सुरुच राहिल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे. पावसामुळे संगमेश्‍वर तालुक्यातील पूरगाव येथे विहिरीचा कठडा कोसळल्याने 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.