जिल्हा परिषद शाळांना टप्प्याटप्प्याने होणार पाठ्यपुस्तकांचे वितरण

रत्नागिरी:- राज्यातील मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 2026-27 पर्यंत टप्प्याटप्प्याने एकात्मिक आणि द्विभाषिक, सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला
आहे.

यंदा मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांतील दुसरीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात आली आहेत. गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ विद्यार्थ्यांना इंग्रजीतून कळले आणि शिक्षकांनी अध्यापन करताना स्पष्टीकरण केल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे होईल, या विचारप्रवाहातून शालेय शिक्षण विभागाने पुस्तके द्विभाषिक करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने 2020-21 मध्ये राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली.

मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना 2022-23 पासून एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने 2026-27 पर्यंत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील.

विषयतज्ज्ञांशी सल्लामसलत करून अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी विद्या प्राधिकरण, पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी बालभारतीची असेल. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. त्याचबरोबर पाठ्यपुस्तके बालभारतीकडून खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जातील, असेही नमूद करण्यात आले आहे. 

2023-24 मध्ये मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या सर्व शाळांतील पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना, आदर्श शाळांतील तिसरीच्या विद्यार्थ्यांना, 2023-25 मध्ये मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिली, दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना, आदर्श शाळांतील चौथीच्या विद्यार्थ्यांना, 2025-26 मध्ये मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना, आदर्श शाळांतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना, तर 2026-27 मध्ये मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील.