जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी पावसाची दमदार हजेरी

रत्नागिरी:- सलग तिसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे दरड कोसळणे, रस्ते खचणे हे प्रकार सुरुच आहेत. पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रविवारी (ता. २६) सकाळी ८.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड ७५, दापोली १५८, खेड २१, गुहागर १३४, चिपळूण ७३, संगमेश्‍वर १३०, रत्नागिरी १८७, लांजा २७५, राजापूर १६९ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ४२७ मिमी पाऊस झाला आहे. शुुक्रवारपासून पावसाला आरंभ झाला. त्याचा जोर उत्तरोत्तर वाढत असून रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरुच होता. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात झाला असून काजळी नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसामुळे बामणोली-खडीकोळवण येथे रस्त खचला असून वाहतूक थांबविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. तसेच नांदलज येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेली माती, दगड बाजूला करण्यात आली आहे. देवरुख पांगरी मार्गावरही काही ठिकाणी माती कोसळली होती; परंतु त्याचा वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पावसामुळे भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकर्‍यांनी लावणीसाठी उकळणी करण्यास सुरवात केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी येथे भात रोपं काढण्यास सुरवात झाली आहे. पाऊस लांबल्यामुळे लावणीच्या कामांना उशिर झाला होता. दरम्यान, वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. मिर्‍या किनार्‍यावर अजस्त्र लाटा फुटत असून किनार्‍यावरील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बंधार्‍याच्या सुरक्षिततेसाठी सिमेंटचे त्रिशंकु किनार्‍यावर टाकले जात आहे. भर पावसामध्ये हे काम सुरु करण्यात आले आहे.