खंडाळ्यात सॉ मिलच्या कटरमध्ये सापडून मालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- लाकडे चिरण्यासाठी गिरण चालू करायला गेलेल्या गिरण मालकाचा पाय घसरून तो लाकडं कापणाऱ्या करवतीत सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सुरुवातीला एक हात आणि त्यानंतर छातीचा अर्धा भाग करवतीमध्ये मध्ये कट झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाटत खंडाळा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पटेल(वय ४९) यांची वाटद खंडाळा येथे विजय स्वा मिल आहे. रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास रमेश हे लाकडे चिरण्यासाठी मिल सुरू करायला गेले होते. विजेचा खटका सुरु केल्यानंतर ते मागे फिरत असतानाच त्यांचा पाय सरकला आणि ते लाकडे चिरणाऱ्या करवतीच्या पात्यावर पडले.त्यांचा हात दंडातून कापला गेल्याने हात शरीरापासून वेगळा झाला.हात शरीरापासून वेगळा झाल्यानंतर करवतीचे ब्लेड त्यांच्या छातीत घुसले. आणि करवत आरपार गेली.

यामध्ये रमेश पटेल यांच्या छातीचा भाग पूर्णपणे कापला गेला.ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणी रक्ताचे पाट वाहत होते. छातीचा भाग पूर्णपणे कापला गेल्याने रमेश पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहिल्यानंतर घरच्यांनी आरडाओरड केली.त्यामुळे बाजूच्या लोकांनी पटेल यांच्या गिरणीकडे धाव घेतली.

या अपघाताची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात ठिकाणचे चित्र पाहून साऱ्यांचे हृदय हेलावले. या घटनेची नोंद जयगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.