जिल्ह्यात एक लाख ग्राहकांकडे २७ कोटींची थकबाकी

रत्नागिरी:-:ग्राहकांकडून वीजबिलांच्या स्वरूपात जमा होणाऱ्या पैशांतून वीज खरेदी व दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवावे लागतात. ग्राहकांनी नियमित वीजबिल भरणा न केल्यास हा खर्च भागवणे कठीण होते. तेव्हा ग्राहकांनी नियमित बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडितची कारवाई करा, असे आदेश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. जिल्ह्यात १ लाख ग्राहकांकडे २६ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी येथे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, कैलास लवेकर, विशाल शिवतारे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील आहे. ग्राहकांकडून वीजबिलांच्या स्वरूपात जमा होणाऱ्या पैशांतून वीज खरेदी व दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवावे लागतात. त्यामुळे थकबाकी वसुली महत्त्वाची आहे. ती करा अन्यथा वीज जोडणी तोडा, असे आदेश डांगे यांनी दिले.