शिक्षक बदल्यांसाठी पोर्टलवर माहिती भरण्याचे काम 99 टक्के पूर्ण 

पोर्टलवर माहिती भरण्यासाठी 26 जुनपर्यंत मुदत

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेतील पहिला टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पोर्टलवर वैयक्तिक माहिती भरण्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात बदलीसाठी आवश्यक शाळांची माहिती भरावयाची आहे.

जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी पोर्टल बनविण्यात आले होते. मागील दोन वर्षे कोरोनातील परिस्थितीमुळे बदल्या झालेल्या नव्हत्या. अनेक शिक्षक दुर्गम प्रदेशातील शाळांमध्येच असून त्यांना पुन्हा सुगम शाळांमध्ये येण्याची प्रतिक्षा आहे. पात्र असलेल्या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शासनाने बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रक्रिया 31 मे पर्यंत पूर्ण करावयाची होती. पण सुगम-दुर्गम शाळांची यादी निश्‍चित करण्यास वेळ लागल्यामुळे बदल्या होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. परंतु शासनाने पोर्टलवर माहिती भरण्यासाठीची प्रक्रिया चालू ठेवा असे आदेश जुनच्या पहिल्या आठवड्यात काढले होते. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांमध्ये 6 हजार 100 शिक्षक आहेत. त्या शिक्षकांना वैयक्तिक माहिती भरण्यासाठी 26 जुनपर्यंत मुदत दिली होती. आतापर्यंत 99 टक्के शिक्षकांनी माहिती भरलेली आहे. त्यात शिक्षक म्हणून कधी रुजू झालाता, कोणत्या शाळेत किती वर्षे झाली, वय यांचा समावेश आहे. हा बदलीचा पहिला टप्पा असून दुसर्‍या टप्प्यात बदलीसाठीच्या शाळांची माहिती भरावयाची आहे. तिसर्‍या टप्प्यात बदलीचे आदेश काढले जाणार आहेत; मात्र कोकणात पावसाळा असल्यामुळे यंदा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याची चर्चा सुरु आहे. प्रशासनाकडून बदल्यांसाठी आवश्यक माहिती भरुन ठेवली जाणार आहे.