मासेमारी बंदी कायद्याचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या कासारवेलीतील दोन नौकांवर कारवाई

रत्नागिरी:- मासेमारी बंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या २ मच्छीमारी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली. तालुक्यातील कासारवेली येथे ही कारवाई केली असून दोन्ही बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे काही प्रमाणात मासळी सापडली असून त्याचा लिलाव केला जाणार आहे.

राज्याच्या सागरी जलहद्दीमध्ये १ जून पासून मासेमारी बंद लागू करण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत ही मासेमारी बंदी लागु आहे. पावसाळ्यातील हे दोन महिने समुद्रातील माशांचा प्रजनन कालावधी असतो. मत्स्य उत्पादन वाढीच्यादृष्टीने तो महत्त्वाचा असल्याने शासनाने या कालावधीत ही बंदी घातली आहे. या बंदी कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित नौका मालकांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही
यापूर्वीच सहायक मत्स्य आयुक्त एम. व्ही. भादुले यांनी दिला होता. त्यानुसार मत्स्य विभागाकडुन गस्त सुरू होती. पावसाने उघडीप दिल्याने आणि समुद्र शांत असल्याने अनेक मच्छीमार या बंदी कालावधिचे उल्लंघन करून बेकायदेशीर मासेमारी करतात. या माहितीच्या आधारे मत्स्य विभागाने गस्त वाढवली होती. तालुक्यातील कासारवेली येथे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोन नौका मत्स्य विभाने पकडल्या.

नामदेव शिरगावकर आणि प्रल्हाद शिरगावकर यांच्या या दोन नौका आहे. बंदी कालावधित मासेमारी केल्या प्रकरणी त्यांच्यावर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. या दोन्ही बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. सुधारित मासेमारी कायद्यानुसार त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. परवाना अधिकारी स्मितल कांबळे यांच्यासह त्यांच्या टीमने ही कारवाई केली.