प्रसिद्ध मारुती मंदिराचे स्थलांतर नाही; ट्रस्टला कोणतीही नोटीस नाही: मुख्याधिकारी बाबर

रत्नागिरी:- मारुतीचे मंदिर स्थलांतरित करा, असे कोणतेही नोटीस ट्रस्टला पालिकेने बजावलेले नाही. टीपी प्लॅनमध्ये हे फक्त आयलॅंड दाखवले आहे. ट्रॅफिक आयलॅंड नाही. त्यामुळे मंदिर स्थलांतरित होण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले. त्यामुळे शहराचा मान आणि शान असलेल्या मारुती मंदिर सर्कलमधील मारुती मंदिरची धार्मिकता कायम राहणार आहे. हे मारुती मंदिर स्थलांतरित करावे लागण्याची भिती व्यक्त केली जात होती. याबाबत अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. पालिकेने खुलासा केल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

शहरातील हे मंदिर स्थलांतरित करण्याबाबत पालिकेने मंदिराच्या ट्रस्टींना नोटीस बजावल्याच्या चर्चेवरून हे गुऱ्हाळ सुरू झाले. रत्नागिरी शहराची जी हद्द दाखवण्यात आली आहे. मारुती मंदिर ही रत्नागिरीच्या या सर्कलला नाव देणारे वेशीवरील मंदिर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे शेकडो भाविकांची घोर निराशा झाली होती. 

२०१७ मध्ये शहराची नगररचना योजनेंतर्गत या मारुती मंदिर येथील ट्रॅफिक लँड करण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली. त्यासाठी २०१४-१५ ला हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे समजते. 

शासनाने २०१६ ला या नगररचना योजनेला मान्यता दिली. त्यामुळे आता मारुती मंदिर येथील मारुतीचे देऊळ स्थलांतरित करण्याच्या सूचना नगर पालिकेने संबंधित मंडळाला दिल्या आहेत. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, शहरातील मारुती मंदिर येथील मंदिर स्थलांतरित करण्यात यावे, याबाबत कोणतीही नोटीस आम्ही ट्रस्टींना दिलेली नाही; मात्र ट्रस्टींनी आम्हाला पत्र दिले होते की, आम्हाला जागा उपलब्ध झाल्याशिवाय स्थलांतर करण्यात येऊ नये; मात्र ट्रस्टीने हे पत्र का दिले आणि कोणत्या माहितीच्या आधारे दिले, याची कल्पना नाही. याचा सातबारा पालिकेच्या नावे आहे; परंतु पालिकेने स्थलांतराबाबत कोणतेही नोटीस दिलेले नाही. त्यामुळे मारुती मंदिर स्थलांतराचा विषयच येत नाही.