शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देणार ‘मेघदूत’ अँप

रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने शेतकर्‍यांना स्थानिक पातळीवर आणि शेतकर्‍यांच्या स्थानिक भाषेत हवामान अंदाजाची माहिती मिळावी, यासाठी मेघदूत या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता मोबाईलवर घरबसल्या स्थानिक ठिकाणच्या हवामानाचा अंदाज समजणार आहे.

हवामानाचा अंदाज शेतकर्‍यांना वेळेवर आणि अचूक मिळणे खूप गरजेचे आहे. कारण जर शेतकर्‍यांना आगाऊ हवामानाचा अचूक अंदाज मिळाला तर शेतकर्‍यांना सजग होऊन शेतात करायच्या आवश्यक गोष्टी पटकन करता येतील व होणार्‍या संभाव्य नुकसानपासून वाचता येईल. अचूक हवामानाचा अंदाज न मिळाल्याने शेतकरी गाफील राहतात. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते व शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. गेल्यावर्षी ही स्थिती उद्भवली होती. एवढेच नाही तर अचूक हवामान अंदाजा मुळे शेतकर्‍यांना पिकांचे व्यवस्थापन करणे देखील सोपे जाते.

या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून भारतीय हवामान विभाग शेतकर्‍यांना स्थानिक पातळीवर आणि स्थानिक भाषेत हवामान अंदाजाची माहिती मिळावी यासाठी मेघदूत अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या गाव पातळीवरील हवामानाची माहिती त्यांच्या भाषेत मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत असून, यासाठी शेतकर्‍यांना फक्त एका फोन नंबर वर कॉल करावा लागेल.

अद्याप कुठलाही नंबर जारी करण्यात आला नसून लवकरच क्रमांक जारी करण्यात येणार आहे. हा नंबर फक्त हवामान अंदाजाच्या माहितीसाठी असेल. शेतकर्‍यांनी फक्त हा नंबर डायल केला की लगेच त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत त्यांच्या गाव पातळीवरील हवामान अंदाजाची माहिती पटकन मिळेल. त्यामुळे या सुविधेचा फायदा शेतकर्‍यांना होणार असून संभाव्य पिकांच्या नुकसानीपासून ते वाचू शकतात. एवढेच नाही तर हे अ‍ॅप हवामाना सोबतच शेतातील पिके आणि पशुधनाची देखील माहिती इंग्रजी आणि  स्थानिक भाषांमध्ये दिली जाणार आहे.