जिल्हा परिषदांमधील पदभरती प्रक्रिया रखडली

रत्नागिरी:- राज्य शासनाने मार्च 2019 मध्ये राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 13 हजार 521 पदांसाठी अर्ज मागवले होते. ज्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले ती भरती प्रक्रिया 4 वर्षांपासून रखडली आहे. ही रखडलेली भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार, असा सवाल सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून केला जात आहे.

अर्ज देवूनही भरती प्रक्रिया होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, औषध निर्माता,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक लेखा, वरिष्ठ सहायक लिपिक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी अशा 13 हजार 521 पदांसाठी शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली होती.
13 हजार 521 पदांसाठी राज्यभरातून 12 लाख 72 हजार 329 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरी लागावी यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते.

या अर्जांद्वारे शासनाकडे सुमारे 25 कोटी 87 हजार रुपयांचा निधी जमा झाला होता. जून 2022 महिना उजाडला तरी शासनाने अद्यापही भरती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून पदभरती झालेली नाही. सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून परीक्षा कधी होणार? याबाबत जिल्हा परिषदांमध्ये विचारणा होत आहे.
परीक्षा वेळेत होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यग्रस्त होत आहेत. तरी शासनाने रखडलेली जिल्हा परिषदांमधील विविध पदांची भरती तत्काळ घेऊन युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषदांच्या विविध पदांची रखडलेली परीक्षा तत्काळ घ्यावी, या मागणीचे निवेदन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले आहे.