8 ते 10 जणांच्या जमावाकडून महिलेला गाडीत घुसून मारहाण

चिपळूण:- गाडीतील आंबा पेटीचे लगेजचे पैसे दिले नाही म्हणून गुहागर ते मुंबई प्रवास करणार्‍या महिलेला 8 ते 10 जणांनी गाडीत घुसून मारहाण केल्याची तक्रार चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. ही घटना 7 जून रोजी सायंकाळी 7.45 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अंजली शांताराम डिंगणकर (48, पिंपरीवाडा, मालाड, मुंबई) यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली डिंगणकर या पद्मावती ट्रॅव्हल्सने आबलोली ते गोरेगाव मुंबई असा कुटुंबासह प्रवास करत होत्या. यावेळी क्लिनरने त्यांच्याकडे असलेल्या आंबा पेटी लगेजचे पैसे मागितले. डिंगणकर यांनी पैसे देण्यास नकार दिला. ही बाब क्लिनरने मालकाला सांगितली. मालकाने तळी येथे गाडी थांबवून 8 ते 10 जणांसह गाडीमध्ये घुसून काठीने डोक्यात मारहाण केली. यामध्ये डिंगणकर या जखमी झाल्या. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. 

डिंगणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आशिष गजानन चव्हाण व इतर 8 ते 10 जणांवर भादविकलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.