दापोलीत घराला आग लागून घर जळून खाक

दापोली:- तालुक्यातील टांगर येथील रहिवासी अनवरी खलील निरबाडकर यांच्या घराला लागलेल्या आगीत घर पूर्णतः जळून बेचिराख झाले. आगीत घरातील सामनासह 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

 गुरुवारी रात्री घरी लाईट नसल्यामुळे निरबाडकर हे मुलगी, सासू यांच्यासह शेजारच्या घरात बसायला गेले. विजांचा कडकडाट पाहून त्यांनी बाहेर येऊन पहिलं तर त्यांच्या घराला आग लागली होती. आगीने अवघ्या काही वेळात रौद्ररूप धारण केले होते. घराच्या लाकडी वाशांनी पेट घेतला होता. पंखा,  टिव्ही, कपडयाने पेट घेतला होता. सोन्याचे 5 तोळ्यांचे दागिने, व रोख रक्कम 40 हजार जळून खाक झाली होती. तेवढ्यात फ्रिजचा स्फोट सारखा आवाज झाल्याने सारेजण त्या दिशेने धावले. आग आटोक्यात आणण्यासाठी सारे जण प्रयत्न करत होते मात्र त्यात यश आले नाही.

दरम्यान ही माहिती टांगर ग्रामपंचायत सदस्य सईद कोंडेकर व मेहबूब कोंडेकर यांनी दापोली नगर पंचायतीकडे अग्निशमन दलाची मागणी केली. त्यानंतर दोन तासाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

  ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी शुक्रवारी सकाळी पंचनामा केला. यामध्ये 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाच्या तोंडावर घर बेचिराख झाल्याने निरबाडकर कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. शासनाने वेळी याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.