जिल्हा परिषदेत वाहनांना नो एन्ट्री; रस्त्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांनी वाहने लावयाची कुठे, असा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे काम सुरू असल्याने पार्किंगसाठी जागा नाही. जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने उभी केल्यास दुकानदारांच्या तक्रारीमुळे वाहतूक पोलिसांकडुन कारवाई सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेकडून पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. मग येणाऱ्या नागरिकांनी वाहने कुठे उभा करायची, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केले आहे.

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना सध्याच्या इमारतीच्या मागे वाहने पार्किंग करण्यासाठी मोठी जागा होती. आतापर्यंत वाहने पार्किंगचा प्रश्न आला नव्हता; परंतु नवीन इमारतीचे काम पाठच्या बाजूला रिकाम्या जागेत सुरू आहे. त्यामुळे या जागेच्या भोवती पत्र्याचे कंपाऊंड घालून बंदिस्त करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या टोकावरून जिल्हा परिषदेमध्ये नागरिक कामानिमित्त येतात; मात्र आता या अभ्यागतांना वाहने पार्किंग करण्यासाठी जागाच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे नागरिक जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला वाहने लावतात. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते. तसेच बाजूला दुकानगाळे असल्याने त्या दुकानदारांना या वाहनांचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. जिल्हा परिषदेने येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा बंदोबस्त करावा. त्याचा त्रास आम्हाला नको, असे दुकानदारांचे म्हणणे आहे.
दुकानदारांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी रस्त्यात पार्किंग करून ठेवलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. एकतर पार्किंग नाही आणि रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली तर पोलिसांकडून कारवाई होते. त्यामुळे वाहनधारक कात्रीत सापडले आहेत. या वाहनधारकांनीच जिल्हा परिषद प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.