जिल्ह्यातील 51 हजार 963 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मोफत गणवेश वाटप या योजनेंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षालाच जिल्ह्यातील ५१ हजार ९६३ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन गणवेशासाठी ६०० रुपये अनुदान दिले जाणार असून ३ कोटी ११ लाख ७७ हजार रुपये निधी वितरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शासनाकडून शाळास्तरावर मोफत पाठ्यपुस्तकांसह विद्यार्थ्यांच्या खात्यावर मोफत गणवेशासाठी विशिष्ठ रक्कम जमा केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच शाळांमध्ये १०० टक्के पटनोंदणी, १०० टक्के विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थी गळतीचे प्रमाणे शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार अशा योजना शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलगे, अनुसूचित जमाती प्रवर्ग मुलगे, दारिद्र्य रेषेखालील मुले यांना मोफत गणवेश’ योजनेचा लाभ दिला जात आहे. आता एका शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेपासून वंचित न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुर्वी मोफत गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती. पण त्यासाठी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्याची कार्यवाहीत काही विद्यार्थ्यांसमोर अडचणी आल्या होत्या. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापकाच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत गणवेशासाठी शासनाकडून तरतूद केली आहे. ३ कोटी ११ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा निधी गणवेशासाठी वितरीत होणार आहेत. हा निधी शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला पती गणवेश ३०० रुपये प्रमाणे २ गणवेशासाठी ६०० रु. चा निधी दिला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील एकुण ५१ हजार ९६३ विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामधील ३७ हजार ३९९ मुलींसह एससी वर्गातील २ हजार ९७७ मुले, एसटी पवर्गामधील १ हजार ००१ मुले आणि दारिद्र्य रेषेखालील १० हजार ५ मुलांना गणवेश मोफत योजनेचा लाभ दिला जाणार आहे.