चिपळूणमधील महापुरात अपरांत रुग्णालयातील मरण पावलेल्या आठ रुग्णांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत

चिपळूण:- चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पुर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोव्हिड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या या मानवतेच्या पावलामुळे मरण पावलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२१ आणि २२ जुलै २०२१ रोजी पूर आल्याने अपरांत रुग्णालयाच्या कोरोना केंद्रात ८ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. या विनंतीची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून मृत कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना ही आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

राज्य शासनाच्या उप सचिवांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही मदत देत असल्याचे कळविले आहे. दिनांक २१ जुलै २०२१ आणि दिनांक २२ जुलै २०२१ रोजी करोनामुले मरण पावलेल्या ८ करोना रुग्णांच्या नातेवाईकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून एक विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून ही आर्थिक मदत मिळण्याची विनंती करण्यात आली होती. त्या विनंती नुसार मृत करोना रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत देण्यास या पत्राद्वारे मंजुरी देण्यात आली आहे, असे उप सचिवांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची प्रत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आली असल्याचेही सचिवांनी म्हटले आहे.