आरटीईअंतर्गत राखीव शाळा प्रवेशासाठी निधीची प्रतीक्षा; 15 कोटी निधीची आवश्यकता

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी सन 2018-19 पर्यंत शाळांना 100 टक्के निधी प्राप्त झाला आहे. पण सन 2019-20 साली अवघा 17 टक्के निधी प्राप्त झाला असून, त्यानंतरचा निधी प्रलंबित आहे. अद्याप जिल्ह्यासाठी पाच कोटी 15 लाख 28 हजाराचा निधी अपेक्षित असून शिक्षण विभागाकडून त्या निधीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

शासनाकडून हा निधी प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थासमोर मोठा पश्न निर्माण झालेला आहे. हा निधी प्राप्त होताच शाळांना रक्कम वितरित केली जाणार असल्याचे जि.प.शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी शाळांना शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील 17 टक्के निधी प्राप्त झाला आहे. 2020-21 या वर्षांतील पूर्ण निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या निधीसाठी शिक्षण विभागाकडे फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यासाठी आरटीई अंतर्गंत शासनाकडून गेल्या तीन वर्षांत फक्त दोनवेळाच निधी प्राप्त झालेला आहे. सन 2018-19 पर्यंत शाळांना शंभर टक्के निधी प्राप्त झाला आहे. सन 2019-20 साली अवघा 17 टक्के निधी प्राप्त झाला आहे. अजूनही जिल्ह्यासाठी पाच कोटींची थकबाकी शासनाकडे आहे. शासनाकडून एकूण पाच कोटी 15 लाख 28 हजाराचा निधी अपेक्षित आहे. शिक्षण विभागाकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.