पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके; 5 लाख 27 हजार पुस्तके प्राप्त

रत्नागिरी:- शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांच्या स्वागताबरोबरच विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. जिल्ह्यासाठी मागणी केलेल्या 6 लाख 14 हजार 66 पाठपुस्तक संचापैकी  5 लाख 27 हजार 187 पुस्तक संच (85.85 टक्के) शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले असल्याची माहिती पाथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे रोखलेला नव्या शैक्षणिक वर्षाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या दणक्यात करण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आखलेले आहे. जूनमध्ये या शैक्षणिक सत्राला प्ररंभासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पुस्तकांचे वितरण सुरू झालेले आहे. येत्या 17 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाने पुन्हा गजबजणार आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव देखील बारगळला होता. नवागतांनी तर वर्ग देखील पाहिला नव्हता. मुलांचे आनदंमयी स्वागतावर पाणी फेरलेले होते. पण कोरोनाच्या सावटानंतर यावर्षीचे नवे शैक्षणिक वर्ष मोठ्या उत्साहाने सुरू होणार आहे. त्याबाबचे सर्व नियोजन शिक्षण विभागस्तरावरून करण्यात आलेले आहे.

‘शाळा प्रवेशोत्सव’  कार्यकमामध्ये 6 ते 14 वयोगटातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी नियोजन करण्यात शिक्षण विभाग गुंतला आहे. 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अशा योजना राबविण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकदिन साजरा करण्यात येणार आहे. 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येणार आहे.

या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अडीच हजार पाथमिक शाळांमध्ये मोफत पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. त्यासाठी 6 लाख 14 हजार 66 पाठपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्या पाठ्यपुस्तक संचापैकी आतापर्यंत 5 लाख 27 हजार 187 पुस्तक संच (85.85 टक्के) शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाले. पत्येक तालुकास्तरावरून ती केंद्र पमुखांकडे दिली जाणार आहेत.

मागणी केलेल्या मराठी व उर्दू माध्यमाचे पुस्तक संचामध्ये रत्नागिरी- मराठी 116141, उर्दू 16957, चिपळूण – मराठी 47954, उर्दू 5230, मंडणगड – मराठी 20897, उर्दू 5031, खेड- मराठी 56298, उर्दू 3182, दापोली -मराठी 33222, उर्दू 9352, गुहागर- मराठी 47168, उर्दु 2834, संगमेश्वर- मराठी 68042, उर्दू 1032, लांजा – 43982, उर्दू 1698, राजापूर- मराठी 60284 , उर्दू 6012 इतके संच आवश्यक आहेत.