अनधिकृत शाळा सुरू ठेवल्यास बसणार एक लाखांचा दंड 

रत्नागिरी:- कोणतीही अनधिकृत शाळा सुरु असल्यास संबधित शाळेच्या व्यवस्थापनास 1 लाख रुपये इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन 10 हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात यावा असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी 20 मे रोजी दिला. त्यामुळे अनधिकृत शाळांना चाप बसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.

राज्यातील 674 अनधिकृत शाळांची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी, विद्यार्थ्यांचेशैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर शाळांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अनधिकृत शाळांची यादी शासन संकेतस्थळावर तत्काळ प्रसिद्ध करावी अशी मागणी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे केल्या होत्या.
या संदर्भात सुरज मांढरे यांनी प्राथमिक व माध्यमिक संचालकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याची गांभीर्याने दखल घेऊन संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना कडक निर्देश दिले आहेत.

सदर शाळा अनधिकृत असून शाळेमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेऊ नये, सदर शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी स्पष्ट सूचना असलेला लोखंडी अथवा प्लेक्स बोर्ड शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा, सदर शाळांच्या नावांची यादी आपल्या कार्यालयामध्ये दर्शनी, कार्यक्षेत्रातील मुख्य चौक, रस्ते, मार्ग आदी ठिकाणी सर्व नागरिकांना सुस्पष्ट दिसेल अशी जाहीरपणे लावावी, शासन नियमानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास तत्काळ सादर करण्याचे आदेश दिनकर टेमकर यांनी दिले सर्व शिक्षणाधिकार्‍यांना आहेत.