कोकणी मेव्याच्या विक्रीतून बचत गटातील वीसजणांच्या हाताला रोजगार

रत्नागिरी:- हापूस, पायरी, मालगीस यासह विविध कोकणी मेव्यांच्या विक्रीमधून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे महात्मा बळी राजा शेतकरी गटाने केला आहे. पुरुष आणि महिलांचा सहभाग असलेल्या या गटातील वीस सभासदांना रोजगाराचे साधन तयार झाले आहे.

रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावर आयोजित रत्न कृषी महोत्सवामध्ये गटाचे प्रमुख विलास गोरीवले यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनामध्ये येणार्‍या अनेकांनी या स्टॉलला भेटी दिल्या. त्यांच्याकडील कोकणी मेव्याची खरेदीही केली. या स्टॉलवर हापूस, पायरी, मालगीस, रायवळ जातींचे विविध आंबे यासह आंबा पोळी, फणस पोळी, नाचणी लाडू, सफेद व पांढरे जाम, आवळा, करवंद, पापड, फेणी, रतांबा यासारखी वीसहून अधिक उत्पादनांची विक्री एकाच गटामार्फत केली जाते. गटातील वीस सभासदांच्या बागायतीमध्ये पिकवले जाणारी उत्पादने अशा महोत्सवांमधून विक्रीला ठेवली जात आहेत. गतवर्षी चिपळूण येथे झालेल्या कृषी महोत्सवात वीस हजार रुपयांचा माल त्यांनी विकला होता. गटाचे अध्यक्ष विलास गोरीवले यांची स्वतःची हापूसची अडीचशे कलमे आहेत. त्यातून दरवर्षी दोनशेहून अधिक हापूस पेटी ते विकतात. सरासरी १२०० ते १५०० रुपये दर त्यांना मिळतो. कृषी महोत्सवासह थेट ग्राहकाकडे आंबा पाठविण्यावर त्यांचा भर असतो. रत्नागिरीत सुरु असलेल्या रत्न कृषी महोत्सवात पायरी आंबा २५० रुपये तर हापूस ३०० रुपये डझनने ते विक्री करत आहेत. पहिल्याच दिवशी दहा डझन आंब्याची विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही कृषी विभागाने रत्नागिरीत घेतलेल्या महोत्सवात १५ ते २० हजार रुपयांची विक्री त्यांनी केली होती. जुलै २०२१ मध्ये पोमेंडी येथे घेतलेल्या रान भाजी महोत्सवत दहा हजार रुपयांची भाजी विकली. यात टाकळा, करटोली, काकवी, कुडा, भारंगी अशा प्रकारच्या सुमारे २४ भाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या.