रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचे डबे पूर्वीप्रमाणे अनारक्षित करा 

मुंबईतील प्रवाशांची मागणी

रत्नागिरी:-रत्नागिरी पॅसेंजर पूवीप्रमाणेच दादरहून सोडून संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, अशी मागणी मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्‍या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेविषयक अभ्यासक अक्षय महापदी यांनी एक सविस्तर निवेदन रेल्वेला दिले आहे.

पूर्वीची गाडी क्र. 50104/50103  रत्नागिरी -दादर पॅसेंजरची आता रत्नागिरी दिवा पॅसेंजर झाली आहे. कोव्हीडपूर्व काळात रत्नागिरी दादर पॅसेंजरला दोन आरक्षित डबे होते तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे प्रत्येकी एक अनारक्षित डबा उघडत असे. रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांतून मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांमध्ये चढणे हे अद्यापही एक दिव्यच आहे. गाड्या संबंधित स्थानकांत पोहोचण्याआधीच गर्दीने ओसंडून वाहत असल्यामुळे आरक्षण असूनही एखाद्याला आपली आरक्षित जागा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे येथील प्रवाशांना त्या त्या स्थानकात उघडणार्‍या अनारक्षित डब्यांचा मोठा आधार होता. परंतु , आता आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत, अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे.

कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतही कोकण रेल्वेने वरील सुविधा अद्याप पूर्ववत केलेल्या नाहीत. ही गाडी कोरोना काळापासून दादरऐवजी दिव्यावरुन रत्नागिरीसाठी सोडली जात असल्याने मुंबईतील मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्‍या प्रवासी जनतेला ही गाडी पकडून कोकण गाठणे अत्यंत गैरसोयीचे झाले आहे.

कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात दिवा वीर व पुढे दिवा खेड गाडी चालत असे. ज्या स्थानकांनी आणि प्रवाशांनी खर्‍या अर्थाने कोकण रेल्वेचे उद्घाटन केले त्या माणगाव, महाड, खेड तालुक्यातील प्रवाशांची आजची स्थिती दयनीय आहे. दादर -चिपळूण गाडीची मागणी अद्यापही पूर्ण केली जात नाही. या बाबत प्रवासी जनतेच्या वतीने अक्षय मधुकर महापदी, कळवा (ठाणे) यांनी  दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत चालवली जावी, यासाठी  निवेदन दिले आहे.
या निवेदनाच्या  प्रती अक्षय महापदी यांनी पाठपुराव्यासाठी या निवदनाच्या प्रती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. सुनील तटकरे, खा. विनायक राऊत  आमदार योगेश कदम,  आ. शेखर निकम, आ. भरतशेठ गोगावले,  ना. अनिल परब, ना.आदिती तटकरे विरोधी पक्षनतेने प्रवीण दरेकर यांना दिल्या आहेत.