सौर कृषिपंपाच्या योजनेत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेंतर्गत अंमलबजावणी ; राज्याला ५० हजार पंप

रत्नागिरी:- राज्यातील १६ जिल्ह्यांना मिळणाऱ्या सौर कृषिपंप योजनेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेची अंमलबजावणी यंदाही करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हे सौर कृषिपंप मिळणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाऊर्जाने  केले आहे.

राज्यात सुमारे ५० हजार सौर कृषिपंप कार्यान्वित केले जाणार आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेतून सौर कृषिपंप बसवण्यात येणार आहेत. महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्जदार शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळवण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज करावेत, असे आवाहन कले आहे. राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांस ई-पोर्टलवर अर्ज करण्यास लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात अडीअडचणी आल्यास महाऊर्जाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयातील वेळेवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत ३१ मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप उपलब्ध केले जाणार आहेत.