जुन्या पद्धतीने गणवेशाचा निधी; सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे कठीण

रत्नागिरी:- राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी गणवेशाचा निधी जुन्या पद्धतीनेच जाहीर करण्यात आल्याने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सध्या सरकारी व खासगी शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीतील सर्व मुलींना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्रय रेषेखालील मुलांना मोफत गणवेश दिला जातो. तर ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, अपंग आणि खुल्या प्रवर्गातील मुलांना मोफत शालेय गणवेश दिला जात नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी जोर धरत होती.

इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्‍या निकषपात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचदेण्यात यावेत.प्रति गणवेश तीनशे रुपये या दराने दोन गणवेशांसाठी 600 रुपये तरतूद मंजूर आहे. एकाच विद्यार्थ्यांला दुबार गणवेशाचा लाभ होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे कळवण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीऐवजी केंद्र,  तालुका किंवा जिल्हा पातळीवरून गणवेश वाटपाबाबत निर्णय घेऊ नयेत. अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून जिल्हा स्तरावरून थेट शाळा व्यवस्थापन समितीला अनुदान वितरण करावे, असे नमूद करण्यात आले आहे.

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये 35 लाख 92 हजार 921 विद्यार्थ्यांसाठी 215 कोटी 57 लाख 53 हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.