शिक्षक बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप; जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांचा डेटा शासनाकडे

रत्नागिरी:-जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी मोबाईल अ‍ॅप विकसित केले जात आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या या याच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केल्या जाण्याच्या हालचाली आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सुमारे 6 हजार शिक्षकांचा डेटा राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारेच ऑनलाईन बदलीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण आता रद्द केले आहे. नवीन आणि बदलत्या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यासाठी विशेष अ‍ॅप विकसित केले जात आहे. हे अ‍ॅप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाईन बदली आदेश मिळणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून त्यांच्या शिक्षकांची माहिती संकलित केली जात आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि उपाध्यापक अशा इयत्ता पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतच्या 6 हजार शिक्षकांची माहिती संकलित केलेली आहे. यामध्ये शिक्षकाचे संपूर्ण नाव, गाव, जन्मतारीख, सेवेला सुरुवात, सलग सेवा, पदनाम, पॅनकार्ड, आधारकार्ड इत्यादी माहितीचा समावेश आहे.

ही माहिती जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे दिलेली आहे. हा डाटा शासनाच्या अधिकृत साईटवर अपलोड केला जाणार आहे. त्यानंतर, बदलीची प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शी होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. मात्र, यंदा कोरोनाचे सावट काहीसे दूर झाल्याने पुन्हा बदलीपात्र शिक्षकांना बदलीचे वेध लागले आहेत.