रत्नागिरीत खो-खो, अ‍ॅथलेटिक्स
प्रशिक्षण शिबिराला आरंभ

रत्नागिरी:- जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित खो-खो आणि अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबिरामधून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा रमेश चवंडे रत्नागिरीत केली.

येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर खो-खो आणि अ‍ॅथलेटिक्सच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, खो-खोचे राष्ट्रीय प्रशिक्षण पंकज चवंडे, राज्य असोसिएशनचे माजी सचिव संदिप तावडे, क्रीडाधिकारी विशाल बोडके, प्रशांत कवळे, राजेश कळंबटे, राजेश चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते. याप्रसंगी श्री. चवंडे म्हणाले, मुंबईमध्ये खो-खोचे अनेक दर्जेदार खेळाडू कार्यरत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळत आहेत. त्याच पध्दतीने गेल्या काही वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी मैदानावरही असेच खेळाडू घडवण्याचे कार्य चालू आहे. भविष्यातही यामध्ये सातत्याने राहीले पाहीजे. यासाठी लागेल ती मदत करु.

जिल्हा क्रीडाधिकारी श्री. बोरावडेकर म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन करता आले नव्हते; मात्र वरीष्ठस्तरावरुन आलेल्या पत्रानुसार जिल्ह्यात क्रीडा शिबीरे घेण्यात येत आहेत. खो-खो चा सराव नियमितपणे या मैदानावर केला जातो. आठ दिवसांसाठीच्या शिबिरामधून भविष्यात चांगले खेळाडू घडतील. तर श्री. तावडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतानाच चांगला खेळ करत रहा असे सांगितले. या शिबिरामध्ये पन्नासहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कळंबटे यांनी केले.