लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील माल डब्यात जागा नसल्याने हापूस रत्नागिरी स्थानकात पडून 

रत्नागिरी:-मध्य रेल्वेकडून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील माल डब्यात जागा नसल्याने गेले दोन दिवस साडेचारशे कीलो आंबा रत्नागिरी रेल्वेस्टेशनवरच ठेवण्याची वेळ आली आहे. दक्षिणेकडील रेल्वेस्थानकांवर आयत्यावेळी अधिकचा माल भरल्याने हा प्रकार घडला आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील कामगारांनी उन्हाच्या झळा लागू नयेत म्हणून बॉक्स सुरक्षित ठेवले आहेत. पण हापूसच्या दिल्ली वारीसाठी शनिवारपर्यंत (ता. 30) प्रतिक्षा करावी लागणार असल्याने बागायतदाराकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरीतून हापूस अन्य राज्यात पाठविण्यासाठी रेल्वेसेवा उपयुक्त ठरु शकते. रत्नागिरीतून गेल्या काही वर्षात दिल्लीत कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचा वापर करण्यात येत आहे. मात्र काहीवेळा केरळ, कर्नाटकमधून येणार्‍या रेल्वे गाड्यांना जोडलेल्या माल डब्यात जागा नसल्याने गोंधळ उडत असल्याचे प्रकारही घडतात. त्याचा फटका माल पाठवणार्‍या व्यक्तीला बसतो. असाच काहीसा प्रकार रत्नागिरीतील आंबा बागायतदार समीर दामले यांनी आला आहे. गुरुवारी (ता. 28) निजामुद्दीन एक्स्प्रेसने आंबा दिल्लीत पाठवण्यासाठी दामले यांनी आरक्षण केले; मात्र गर्दी असल्याचे कारण देत शुक्रवारचा मुहूर्त निश्‍चित झाला. राजधानी एक्स्प्रेसमधून हापूसची दिल्लीवारी सुरु होणार होती; मात्र बागायतदाराचे स्वप्न जैसे थेच राहीले. शुक्रवारी राजधानीला जोडलेल्या डब्यांमध्ये 450 किलो हापूस राहील एवढी जागाच नसल्याने निदर्शनास आले. एर्नाकुलमवरुन येणार्‍या या गाडीत मटण भरण्यात आल्यामुळे हापूसला जागाच मिळाली नाही. याबाबत रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील टपाल कक्षाकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा सगळा प्रकार पुढे आला. अखेर तेथील अधिकार्‍यांनी शनिवारचा मुहूर्त दिला आहे. एक्स्प्रसे गाड्यांमधील माल डब्याची स्थिती काय आहे, याबाबत दक्षिणेकडील रेल्वेस्थानकांकडून समन्वय साधला जात नसल्याची नाराजी बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. हापूससह कोकणातून जाणार्‍या मालाला दुय्यम स्थान दिले जाते की काय असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे.

मागील पंधरा दिवसांमध्ये दोन वेळा बागायतदार दामले यांनी आंबे पाठवले, तेव्हा रेल्वेची सेवा चांगली होती. यावेळी हापूस रेल्वेस्थानकावरच ठेवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे उघड्यावर ठेवलेली फळं खराब होतात. त्याची काळजी घ्यावी लागते. ती जबाबदारी आंबा बागायतदारारवच पडते. सुदैवाने कामगारांकडून बॉक्सची काळजी घेतली जात आहे. पण खराब रेल्वे सेवेचा फटका बागातदाराला सहन करावा लागत आहे. रत्नागिरीतून रेल्वेने दिल्लीत हापूस पाठविण्यासाठी दामले यांना तिन दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.