शिक्षक बदल्यांची प्रक्रिया हाती; पहिल्या टप्प्यात जिल्हा बदलीच्या शिक्षकांची माहिती गोळा

रत्नागिरी:- कोरोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती अपडेट केली असून ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर केली आहे. त्यामुळे आता गुरुजींच्या बदल्यांची कार्यवाही सुरु झाली आहे.

प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवण्यासाठी मार्च महिन्यात ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मख्य सचिव राजीव कमार. उपसचिव प्रवीण जैन, के. जी. वळवी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या बदल्यासाठी यू डायस नुसार शाळा व शिक्षकांची माहिती आद्ययावत करणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करणे आदी विषयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या सुचनांनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी यू डायस नसार शाळा व शिक्षकांची माहिती आद्ययावत केली आहे. अनेक शिक्षकांनी चुकीचे इमेल आयडी, मोबाईल नंबर भरले होते. ते आद्ययावत करुन गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत सरल पोर्टलवर दुरुस्ती करुन भरण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची आवश्यक माहिती राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केली आहे.

दरम्यान, प्राथमिक शिक्षकांनी सरल पोर्टलवर 19 मुद्यानिहाय माहिती न भरल्यास लॉगीन आयडी व पासवर्ड मिळणार नाही. तसेच बदलीची नावे भरता येणार नाहीत. नावे नाही भरली तर बदली रॅन्डममध्ये कुठेही होवू शकते. त्यामुळे माहिती भरणे अनिवार्य आहे.