गणपतीपुळेत प्रथमच ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची पिल्ले झेपावली समुद्राकडे 

रत्नागिरी:- जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनार्‍यावर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी दाखल होत आहेत. प्रसिध्द पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या गणपतीपुळे किनार्‍यावरील श्रींच्या मंदिरापासून काही अंतरावर फेरीवाल्यांच्या स्टॉलजवळ कासवांची पिल्ले आढळून आली. समुद्रापर्यंतचे अंतर पार करणे अशक्य होते. यावेळी किनार्‍यावरील जीवरक्षक, स्थानिक स्टॉलधारक सरसावले आणि 17 पिल्लांचा समुद्रात विहारण्यासाठीचा मार्ग सुकर झाला.


कासव संवर्धनासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत प्रचार, प्रबोधन सुरु आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातूनही प्रयत्न होत आहेत. समुद्र किनारी गावांमध्ये कासवमित्र तयार होत आहेत. रत्नागिरी तालुक्यात गावखडी किनार्‍यांवर प्रदिप डिंगणकर हे कासवांच्या घरट्यांचे रक्षण करत आहेत. शांत परिसर असलेल्या किनार्‍यावर बहूतांशवेळी कासवं अंडी घालण्यासाठी दाखल होत असतात; परंतु गणपतीपुळेतील किनार्‍यावर स्टॉलधारकांच्या जवळ पर्यटकांनी गजबजलेल्या भागात एक कासव अंडी घालून गेले होते. 

रविवारी (ता. 24) सकाळी किनार्‍यावरील प्रभाकर गावकर यांच्या स्टॉलच्या बाजूला कासवांची काही पिल्ले रांगत असल्याचे लक्षात आले. ती कासवं रांगत-रांगत समुद्रापर्यंत जाणे अशक्य होते. किनार्‍यावर उंड, घोडे यांची रपेट कायमच सुरु असते. पर्यटकांना फिरवण्यासाठीच्या गाड्या आणि पर्यटकांचा राबता लक्षात घेता ती पिल्ले समुद्रात जाणे अशक्य होते. कासवाची पिल्लं आढळल्यानंतर किनार्‍यावरील जीवरक्षक आणि स्टॉलवालधारकांनी पुढाकार घेऊन 17 पिल्लांचे रेस्क्यु करण्यात आले. एका घमेल्यामध्ये गोळा करुन ती पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले. या मिशनमध्ये जीवरक्षक रोहित चव्हाण, महेश देवरुखकर, उमेश महादे, विशाल निंबरे, अक्षय सुर्वे, रोहित खेडेकर, किसन जाधव यांचा समावेश होता. दरम्यान, पाच वर्षांपुर्वी याच किनार्‍यावर कासवांची घरटी होती. तेव्हा काही पिल्लाचे रेस्क्यु करण्यात आले होते. दरम्यान, त्या कासवाचे घरटे नक्की कुठे आहे हे कोणाच्याही अजुन लक्षात आलेले नाही. त्यामुळे आणखीन अंडी होती किंवा नाही याबाबत कसवमित्रांना समजू शकलेले नाही. सर्वसाधारणपणे अंडी घातल्यानंतर एकवीस दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. यावरुन ते कासव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येऊन गेले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.