खेडमधील जगबुडी नदीत बुडाला टेम्पो; टेम्पोतून उडी मारल्याने चालक बचावला

खेड:- खेड शहराच्या मटण-मच्छी मार्केट जवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात टेम्पो बुडाल्याने खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारल्याने बालंबाल बचावला.

जगबुडी नदीचा भाग उथळ भाग असल्याने एका टेंम्पो चालकाने शॉर्ट कट मारून भोस्ते गावात आपण लगेच पोहोचू शकतो. या हेतुने भरती आलेल्या जगबुडी नदीपात्रात टेंम्पो घातला. टेंम्पो मध्यावर आला आणि टेंम्पोचे चाक पाण्यात रूतल्याने टेंम्पो काही जागचा हेलेना. याचवेळी भरतीला सुरुवात झाली. नदीपात्रातील पाण्याला भरती आल्याने टेम्पोला चारही बाजूने भरतीच्या पाण्याने वेढले. यावेळी मात्र चालकाची पाचावर धारण बसली. प्रसंगावधान राखून त्याने नदीपात्रात उडी मारून आपला जीव वाचवला. पण टेंम्पो मात्र नदीपात्रातील पाण्यात अडकला. त्यानंतर चालक हताशपणे टेंम्पोकडे पहात होता. भरती केव्हा ओसरतेय आणि टेम्पो कधी पाण्याबाहेर अशी त्याला हुरहूर लागली होती. ही घटना शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी सायंकाळच्या वेळी घडली.  दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला. नेमकी त्याचवेळी वादळी वाऱ्यासह अवेळी पावसाळा सुरूवात झाली होती.