अल्पवयीन मुलांचे लग्न लावून देणार्‍या भटजींवर गुन्हा दाखल

गुहागर:-गुहागर येथे घरकामासाठी असलेल्या एका 16 वर्षीय मुलीला प्रेमवीराने पळवून नेवून लग्न केले. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने मुलगा मात्र कायद्याच्या कचाटयात अडकला. एवढच नव्हे तर या दोघांचं लग्न लावून देणारा भटजीवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलगी ही खेड येथील आहे. ती घरकामासाठी गुहागर येथे आली होती. तिचे खेड येथील एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी 8 एप्रिल रोजी पुणे येथे जावून आळंदी या ठिकाणी लग्न केले. 

इकडे भावाने आपल्या बहिणीला पळवून नेल्याची पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि ती दोघं पुणे येथे असल्याचे लक्षात आले. या दोघांनाही गुहागर पोलीस स्थानकात आणण्यात आले. दोघांनीही विवाह केल्याचे कबुल केले.  अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी रमेश रामचंद्र जानकर (20, रा. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

या अल्पवयीन मुलांचे लग्न लावून देणार्‍या आळंदी येथील भटजीचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतर त्याची वरात गुहागर पोलीस ठाण्यात येणार आहे.