संगमेश्वर तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफानी पाऊस,
गारांचा जोरदार मारा

संगमेश्वर:- हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आज सायंकाळी ५:३० च्या दरम्यान खरा होत संगमेश्वर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा वर्षाव होत तासभर पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे झोपडीत रहाणाऱ्या कामगारांसह शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. आजच्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी ५:३० च्या दरम्यान प्रथम जोरदार वादळी वारा सुटला. या वाऱ्यामुळे हवेत धुळीचे लोट उठले आणि काहीच दिसेनासे झाले. पाठोपाठ ढगांचा कडकाडाट आणि विजांचा जोरदार लखलखाट सुरु होत . गारांचा जोरदार वर्षाव सुरु झाला. अचानक वातावरण बदलून गारांचा तडाखा बसू लागल्याने शेतात काम करणारे शेतकरी, मजूरवर्ग, झोपडीतील रहिवासी, पादचारी, दुचाकी चालक यांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तयार व्हायला आलेला आंबा पडून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीज प्रवाह खंडित झाला असून काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या वादळात अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.