गणपतीपुळेत अंगारकी चतुर्थीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

रत्नागिरी:- अंगारकी चतुर्थीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आज मंगळवारी पहाटेला गणपतीपुळेतील मंदिर दर्शनासाठी खुले केले आहे. किनार्‍यावरही सुरक्षेसाठी दहा जणांची नियुक्ती केली असून वॉटर स्पोर्टस्वाल्यांनाही लक्ष ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आल्या आहेत.

कोरोनातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षातील अंगारकीला भक्तगणांना मनासारखे दर्शन घेता आलेले नव्हते. गतवर्षी गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी खुले होते, मात्र किनार्‍यावर जाण्यास मज्जाव केला होता. अनेक पर्यटक दर्शन घेऊन तसेच माघारी परतले. अपेक्षित अशी गर्दीही झालेली नव्हती. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा हिरेमोड झाला. यंदा निर्बंध उठलेले असून अनेक शाळांच्या परिक्षाही संपत आलेल्या आहेत. जोडून शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांचा गणपतीपुळेतील राबता वाढणार आहे. आज अंगारकीला हजारो भक्तगण दाखल होतील असा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव, जयगड सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर, देवस्थानचे डॉ. विवेक भिडे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. गर्दी झाल्यास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तीन ठिकाणी वाहनतळ करण्यात आली आहेत. यामध्ये रत्नागिरीकडून येणारी वाहने आठवडा बाजार, सागरदर्शन येथे थांबवली जातील, चाफे रोडवरुन येणारी वाहने महालक्ष्मी हॉलजवळ तर मालगुंडकडून येणारी वाहने खारभुमीचं मैदान किंवा एसटी बसस्थानकाजवळ उभी करण्याची व्यवस्था केली जाईल. पोलिसांचा तेथे बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांसह शंभर ते सव्वाशे पोलिस पुळेत 19 एप्रिलला नियुक्त केले जाणार आहेत.

उन्हाचा कडाका लक्षात घेता दर्शनासाठी येणार्‍या मंडपाची व्यवस्था देवस्थानतर्फे केली जाणार आहे. दर्शन रांगांचे काम सुरु झाले आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही मंदिरात केली आहे. महाप्रसाद वाटप करण्यासाठीही देवस्थानने नियोजन केले आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर किनार्‍यावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार दहा जीवरक्षक किनार्‍यावर नेमा अशा सुचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. सध्या चार जणांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सागर रक्षक दलाचे सदस्य आणि पोलिस मित्र यांनाही सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त किनार्‍यावर ठेवण्यात येईल असे श्री. कळेकर यांनी सांगितले. विजपुरवठा अखंडित ठेवण्याच्या सुचना महावितरणला बैठकीत केलेल्या आहेत. रत्नागिरीतून गणपतीपुळेकडे येणार्‍या भक्तांसाठी सहा जादा फेर्‍यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पहाटे 3.30 वाजल्यापासून दर्शनाला सुरवात केली जाईल. दुपारी स्वच्छतेसाठी काही काळ मंदिर बंद ठेवले जाईल. त्यानंतर पुन्हा दर्शन सुरु होईल. गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी स्वतः गणपतीपुळेत जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर हे गेले दोन दिवस सुरक्षेसंदर्भात नियोजन करत आहेत. अंगारकीला गणपतीपुळेत 15 पोलिस अधिकारी, 155 कर्मचारी, राखीव पोलिस दलाची तुकडी नियुक्ती केली जाईल. तसेच देवस्थानचे 2 सुरक्षा रक्षक, ग्रामपंचायतीचे 6 आणि एमटीडीसी 4 जीवरक्षक किनार्‍यावर नियुक्त केले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही आढावा घेऊन सुचना दिल्या आहेत. त्यानुसार गणपतीपुळेसह आजुबाजूच्या परिसरातील तलाठी, मंडळ अधिकारी अंगारकीला मंदिर परिसरात नियुक्त केले आहेत. तर नायब तहसिलदार अनिल गोसावी यांना कार्यकारी दंडाधिकारी एक दिवसांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.