जिल्ह्यावर अत्यावश्यक भारनियमनाची टांगती तलवार 

रत्नागिरी:- जिल्हा पहिल्या ए, बी, सी, डी या गटामध्ये मोडत असल्याने भारनियमनातून वगळण्यात आला तरी अत्यावश्यक भारनियमानाचे जिल्ह्यावरील संकट कायम आहे. विजेची तुट भरून काढण्यासाठी गुरूवारी (ता.१४) तारखेला महाजणरेषणच्या आपटा-मुंबई येथुन अत्यावश्यक भारनियमानाचा संदेश आला होता.  यावेळी जिल्ह्यात एक ते दीड तास भारनियमन करण्यात आले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने अत्यावश्यक भारनियमनाची टांकती तलवारर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गेल्या चार दिवसात तसा संदेश आला नसला तरी भविष्यात आल्यास भारनियमन करावे लागणार असल्याच अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यावर वीज टंचाईचे मोठे संकट आहे. त्यात वाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणीही वाढल्याने सुमारे अडीच ते तीन हजाराच्या वर विजेची तुट गेली आहे. त्यात वीजनिर्मित प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे. विजेची ही तुट भरून काढण्यासाठी काही श्रेणीतील गटांमध्ये अत्यावश्यक भारनियमन सुरू केले आहे. ज्या भागात विजेची चोरी, थकबाकी अधिक आहे, अशा इ, एफ, जी, गटामध्ये सकाळी आणि संध्याकाळी हे भारनियम सुरू केले आहे. रत्नागिरी जिल्हा पहिल्या ए, बी, सी, डी या गटामध्ये मोडत असल्याने भारनियमनातून वगळण्यात आला आहे. वीज चोरी, बिल वसूलीचे प्रमाण यानुसार भारनियमनासाठी महावितरणने फिडरनिहाय गट बनवुन त्यानुसार भारनियमन होत आहे.

जिल्ह्याला भारनियमनातून वगळले असले तरी वीज उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याने तुट भरून काढण्यासाठी महावितरणला भारनियमनाचा कठोर निर्णय घ्यावा लागाला आहे. यातून रत्नागिरी जिल्ह्यालाही सुटका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असला तरी हे भारनियमन असल्याचे मान्य करण्यास महावितरण तयार नाही. परंतु महावितरणचे हे भिंग फुटले आहे. जिल्ह्यातही १४ एप्रिलला दीड ते दोन तास भारनियमन करण्यात आले आहे. महाजणरेषणच्या आपटी-मुंबई येथून हा संदेश आल्यानंतर भारनियमन करण्यात आले होते. भविष्यात विजेची तुट भरून काढण्यासाठी, अशा प्रकारे कधीही भारनियमन होऊ शकते, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने भारनियमनाचे संकट जिल्ह्यावर कायम आहे.