जागेच्या वादातून मामाची भाच्याला जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी:- गावातील घर आणि घराभोवती असलेली जागा देत नाही याचा राग मनात धरुन मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खेड येथे घडली. अजय संभाजी महाडिक, (33, बुरोज, शिंदेवाडी, खेड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय महाडिक हा आपला मित्र दिनेश पुजारी याच्यासोबत 13 एप्रिल रोजी रात्री 9 वा. च्या सुमारास हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी नात्याने मामा असलेल्या परशुराम शिंदे, संतोष शिंदे (दोन्ही बोरज, खेड) यांनी तेथे येवून गावातील घर व त्या भोवती असलेली जागा देत नाही याचा राग धरुन मारहाण केली. तसेच त्याचा मित्र यालाही मारहाण करण्यात आली. यावेळी अजय महाडिक (भाचा) याचा शर्ट धरुन ओढत नेत असताना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यामध्ये अजय महाडिक याच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. 

याबाबतची फिर्याद अजय महाडिक याने खेड पोलीस स्थानकात दिल्यानंतर संशयित आरोपी परशुराम शिंदे, संतोष शिंदे यांच्याविरोधात भादवि कलम 325, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.